"त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग" हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व १२ ज्योतिर्लिंगापैकी हे विशेष आहे. हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून २८ किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे. पवित्र “गंगा गोदावरी” नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे. मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर्त तीर्थ आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वर मध्येच आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत ज्या वेदशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा, प्रवचन संस्था चालवितात.
पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की, ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले जे पुढील काळात “ब्रह्मगिरी पर्वत” नावाने विख्यात झाले. या पर्वतावर एके काळी गौतम ऋषींचा आश्रम होता. गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्योतिर्लिंग हा शब्द “प्रकाशस्तंभ” ला दर्शवतो. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर ११ ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडी मध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच “ब्रह्मा-विष्णु-महेश” विद्यमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरु असतो. या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे. आणखी ह्या मंदिराची विशेषता अशी आहे कि ज्योतिर्लिंगावर “त्रिकाल पूजा” केली जाते जी स्थानिक माहितीप्रमाणे ३५० वर्षांपासून चालू आहे, जी द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते.
- श्री आदिगुरू शंकराचार्य कृत द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र
श्लोकाचा अर्थ - पवित्र गोदावरीच्या देशात सह्याद्रीच्या शिखरावर सदा निवास करणाऱ्या त्रिमूर्तीरूप श्री त्र्यंबकेश्वराचे मी अनन्य भक्तिभावाने ध्यान करतो. शुद्ध भावाने जे भक्त इथे दर्शनाला येतात त्यांचे सर्व पाप नष्ट होतात.
“त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट” तर्फे त्र्यंबकेश्वर मंदिर लाईव्ह दर्शन हि एक नाविन्यपूर्ण सुविधा प्रदान करण्यात आली आहे, ज्यामुळे भक्तांना त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन लाईव्ह घेता येईल. हे महत्वपूर्ण पाऊल यासाठी उचलण्यात आले कि, ह्यावर्षी भक्तांना कोव्हीड-१९ ह्या महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाशिवरात्रीला दिव्य ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करता आला नाही. सरकारकडून आलेल्या निर्णयाला अनुसरून मंदिर काही काळ बंदच असणार आहेत, त्यामुळे भक्तांना घरबसल्या दर्शन प्राप्त व्हावे यासाठी हे “लाईव्ह दर्शन” करण्याचे महत्वपूर्ण कार्य त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने केले आहे.
पौराणिक कथांनुसार ज्योतिर्लिंगा पासून लगतच्या परिसरात पुण्यभूमी तयार झाली आहे ज्यामुळे इथे केले जाणारे सर्व मनोरथ सफल होतात. भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी अथवा दोषमुक्त होण्यासाठी इथे अनेक प्रकारचे जप-तप-व्रत मनोभावे करून आपले आराध्य शंकरांना प्रसन्न करण्यासाठी येतात.
बाळाजी बाजीराव ऊर्फ श्री नानासाहेब पेशवे ह्यांनी त्र्यंबकेश्वर मधील विविध पूजा करणारे ज्ञानसंपन्न पुरोहितांना ताम्रपत्र प्रदान केले जे आजही पिढ्यानपिढ्या संरक्षित केले आहे. तेंव्हापासून ताम्रपत्र प्राप्त असलेल्या गुरुजींना "ताम्रपत्रधारी गुरुजी" म्हणून ओळखले जाते. “ताम्रपत्र” म्हणजे तांब्याच्या धातूने बनविलेल्या पत्र्यावर कोरलेले “अधिकार पत्र’’ होय. त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरव मंदिरात उपस्थित असलेले गुरुजी हे अधिकृतरित्या ताम्रपत्रधारी असल्याने केवळ त्यांनाच पूजा करण्याचा विशेष परंपरागत अधिकार प्राप्त आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर व मंदिर परिसरात केले जाणारे धार्मिक अनुष्ठाने करण्याचा परंपरागत अधिकार हा इथल्या स्थानिक गुरुजींकडेच आहे.
त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर परिसरात अधिकृत पुजारी किंवा ताम्रपत्रधारी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली नारायण नागबळी, कालसर्प योग शांती पूजा, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभ विवाह, रुद्र अभिषेक, महामृत्युंजय मंत्र जाप अशा विधी शास्त्रोक्त पद्धतीने विशिष्ट मुहूर्तावर संपन्न केल्या जातात. अशा पावन स्थळी होणाऱ्या अध्यात्मिक पूजेचा लाभ घेण्यासाठी यजमानांनी अधिकृत गुरुजींनाच संपर्क करावा.
प्राचीन काळापासून त्र्यंबकेश्वर मध्ये येणाऱ्या भाविकांनी केलेल्या अनेक पूजांचे वर्णन ह्या पिढ्यानी जपून ठेवले आहे. इथे येणाऱ्या यजमानांना पूजेची यथायोग्य माहिती व मार्गदर्शन हे या गुरुजींद्वारे केले जाते. अनेक काळापासून इथल्या मान्यवरांनी भाविकांच्या सोयीसाठी एकजूट होऊन कार्य केले कालांतराने त्याचे रूपांतर "पुरोहित संघ" नावाने नोंदणीकृत करण्यात आले आहे. पूजा-अनुष्ठान करण्यासाठी येणाऱ्या यजमानांना इथल्या अधिकृत गुरुजींची ओळख पटावी यासाठी "पुरोहित संघ" सर्व गुरुजींना नोंदणीकृत प्रमाणपत्र बहाल करते तसेच ताम्रपत्राची काळजी घेते.
॥ आरती त्र्यंबकराजाची ।।
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ।।
त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा
शशिशेखरा हो।।
वृषभारूढ फणिभुषण दशभुज पंचानन शंकरा हो।।
विभूतिमाला जटा सुंदर गजचर्माबरधरा हो
।। ध्रु० ।।
पडलें गोहत्येचें पातक गौतमक्रषिच्या शिरीं हो।।
त्यानें तप मांडिलें
ध्याना आणुनि तुज अंतरीं हो ।।
प्रसन्न होउनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो ।।
औदुंबरमुळिं
प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ।। जय० ॥ १ ।।
धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णू किती हो ।
आणिकही बहू तीर्थे
गंगाद्वारादिक पर्वतीं हो ।।
वंदन मार्जन करिती त्यांचे महादोष नासती हो ।।
तुझिया दर्शनमात्रे
प्राणी मुक्तीतें पावती हो ।। जय० ॥ २ ।।
ब्रह्मगिरीची भावें ज्याला प्रदक्षिणा जरि घडे हो ।।
तैं तै काया कष्टे
जंव जंव चरणीं रुपती खडे हो ।।
तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्यांचें झडे हो ।।
केवळ तो
शिवरूप काळ त्याच्या पायां पडे हो ।। जय० ॥ ३ ।।
लावुनियां निजभजनीं सकळहि पुरविसि मनकामना हो ।।
संतति संपति देसी अंतीं
चुकविसि यमयातना हो।।
शिव शिव नाम जपतां वाटे आनंद माझ्या मना हो ।।
गोसावीनंदन विसरे
संसारयातना हो ।। जय जय० ॥४॥
हिंदू तीर्थस्थानांपैकी स्वयंभू स्थानात “श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग” ची गणना केली जाते. हे पवित्र मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे जेथून गोदावरी नदी उगम पावली आहे. “गोदावरी नदी” हि महाराष्ट्रातील सर्वांत जास्त लांबीची (१४६५ किमी लांब) नदी आहे. अलीकडे सापडलेल्या ऐतिहासिक पुराव्यावरून असे सिद्ध होते की त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार इ.स.१७५५-१७८६ मध्ये श्री बाळाजी बाजाराव ऊर्फ श्री नानासाहेब पेशवे यांनी ३१ वर्षांच्या कालावधीत पूर्णत्वास नेला. हेमाडपंती शैलीचे हे मंदिर वास्तुकलेचे अद्भुत प्रतीक आहे. मंदिराची उंची ९० फूट असून त्यास पाच कळस आहेत. हे मंदिर काळ्या पाषाणात बांधले आहे ज्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडते.
इथे येणाऱ्या भक्तांना दर्शनाची सोय व्हावी म्हणून मंदिरात प्रवेशासाठी ६ ते ७ रांगा करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नंदीची संगमरवरी मूर्ती स्थापित आहे. अशी मान्यता आहे कि नंदी हा शंकरांचा परम भक्त आहे म्हणून नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा शंकर ऐकतात. मुख्य मंदिरातील गर्भगृहात प्रवेश केल्यावर भाविकांना पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते.
त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे बाराही महिने भाविकांची सतत गर्दी होत असते. श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरी भक्तांची प्रचंड गर्दी होते.
“महाशिवरात्री” हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. हा दिवस फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला असतो. पौराणिक संदर्भानुसार ह्या दिवशी श्री शंकरांनी सृष्टीची रचना केली. त्याचप्रमाणे ह्या दिवशी शिव-पार्वती विवाह झाला. हा पवित्र दिवस भक्तांसाठी मनोकामना पूर्ण करण्यासाठी अति उत्तम मानला जातो. ह्या पवित्र दिवशी भक्त कुशावर्त तीर्थावर पहाटे स्नान करून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी एकत्र येतात. मंदिरात दर्शनासाठीची वेळ सकाळी ५.३० ते रात्री ९ पर्यंत असते तरीही ह्या दिवशी मुख्य मंदिरात हा उत्सव दिवसाचे २४ तास साजरा होतो. अनेक प्रकारे महादेवाची पूजा ह्या दिवशी होते. ज्यात ज्योतिर्लिंगावर जलाभिषेक व रुद्राभिषेक केले जाते. अनेक प्रकारचे होम-हवन तसेच आरती ह्या दिवशी केली जाते. अनेक भक्त ह्या दिवशी रुद्रजाप करतात. प्राचीन परंपरेनुसार महाशिवरात्रीच्या एक दिवस अगोदर अनेक भक्त “प्रदोष व्रत” करतात. प्रदोष व्रत केल्याने शरीरातील चंद्राचे तत्व सुधारले जाते. अशी मान्यता आहे कि चंद्र सुधारल्याने शुक्र व बुध देखील बळावतात. शुक्राने ऐश्वर्य व बुधाने नौकरी व व्यापाराच्या ठिकाणी लाभ होतात. अशा प्रकारे प्रदोष हे मन व शरीर ह्या दोघांवर प्रभाव टाकणारे आहे. शिव महापुराणात प्रदोष व्रताबद्दल अधिक माहिती आहे. ह्या प्राचीन मंदिराची देखभाल पाहण्यासाठी "त्र्यंबकेश्वर संस्थान (ट्रस्ट)" स्थापन करण्यात आले आहे. संस्थानातर्फे भाविकांसाठी भक्तनिवासाची देखील सोय करण्यात आली आहे.
ह्या पुरातन ज्योतिर्लिंगावर “श्री त्र्यंबकेश्वर संस्थान (ट्रस्ट)” मार्फत पंचमुखी मुकुट स्थापित केलेले आहे. अशी आख्यायिका आहे की हे मुकुट स्वतः पांच पांडवांनी स्थापित केलेले आहे. हे “पांडवांकालीन मुकुट” दुर्मिळ असून अनेक हिरे-रत्नादिकांनी जडित आहे. दर सोमवारी दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान त्र्यंबकेश्वर गावात एक रमणीय “पालखी सोहळा” आयोजित केला जातो. ज्यात श्री त्र्यंबकेश्वराचे सुवर्णमुकुट भक्तांच्या दर्शनासाठी आरूढ केले जाते. हे सुवर्णमुकुट ढोल-ताशांच्या गजरात कुशावर्त तीर्थावर अभिषेकासाठी आणले जाते, मग तिथे अभिषेक झाल्यावर आरती होते. आरती झाल्यावर नामघोष गात पुन्हा त्र्यंबकेश्वर मंदिरात हे सुवर्णमुकुट प्रस्थापित केले जाते. अशा रीतीने एका विलक्षण अशा पालखी सोहळ्याची सांगता होते आणि भक्तगण उल्हासित होतात.
पौष शुद्ध एकादशी
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ही वैष्णव संप्रदायाची आद्यप्रवर्तन भूमी असून संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व
गुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ
महाराज यांचे यात्रा-उत्सवानिमित्त सायंकाळी निघणाऱ्या पालखी सोहळ्याचे श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात
स्वागत करण्यात येते.
श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात आलेल्या दिंड्यांद्वारे अभंग - कीर्तन केले जाते
फ़ाल्गुन शुद्ध १५ (होलीका पुजन)
त्र्यंबकेश्वर मंदिर समोरील मुख्य रस्त्यावर सायंकाळी होलीका दहन केली जाते. फ़ाल्युन वद्य प्रतिपदेस धुळवड तसेच फ़ाल्गुन वद्य पंचमीस रंगोस्तव साजरा केला जातो.
चेत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा)
नूतन संवत्सराचे प्रारंभदिनी प्रातःकाली ब्रह्म मुहूर्तावर श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे महापूजन केले
जाते।सायंकाळी परंपरेने पंचांग पुजन करुन ग्राम जोशी मुळे परिवाराकडून पंचांग वाचन केले जाते तसेच सायंकाळी
श्री त्र्यंबकराजांचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा देवस्थान कार्यालयातून सवाद्य मिरवणुकीने पालखीद्वारे मंदिरात
नेला जातो। गर्भगृहातील श्रींच्या मुख्यपिंडीवर प्रदोष पुष्प पूजेवेळी श्री पंचमुखी परमेश्वराचे पूजन केले
जाते.
याचवेळी हर्षमहल (आरसेमहाल) उघडून श्री त्र्यंबकराजांच्या चांदीच्या मुखवट्याची हर्षमहालात
स्थापना केली जाते. सायंकाळचे पूजेसमयी गर्भगृहात असलेला श्री त्र्यम्बकराजांचा सुवर्ण मुखवट्याचे
सुवासीनींकडून औक्षण केले जाते. अशा रितीने चैत्र शुद्ध प्रतिपदेचा उत्सव संपन्न होतो
बैशाख शद्ध तत्तीया (अक्षय तत्तीया)
वैशाख शद्ध तृत्तीया म्हणजेच अक्षय तृत्तीया होय. ह्या सणास हिंद धर्मात अत्यंत महत्व आहे. त्याअनषंगाने त्र्यंबकेश्वर येथील सर्व माहेरवासिनी या व सुवासिनी या शिवकन्या आहेत या भावनेने श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात चैत्रगौर उत्सवाची सांगता म्हणून हर्षमहालात (आरसे महालात) श्री पार्वती मातेची मूर्ति स्थापित करून पूजन केले जाते. व सुवासिनिंना हळदीकुंकू हरभरे व खिरापत वाटप करून उत्सव साजरा केला जातो
वैशाख वद्य अष्टमीस श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील श्री पार्वतीमतेच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा १९ -०५-२०१७ रोजी विधिवत करण्यात आली. या मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचे औचित्य साधुन दरवर्षी पाठात्मक नवचंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
जेष्ठ शुद्ध १५
श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढवारी करीता जाणाऱ्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थान यांच्या पायी दिंडीचे श्री त्र्यंबकेश्वर मंदीराचे मुख्य महाद्रारास मा. विश्वस्तांच्या हस्ते स्वागत करून परंपरेने संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या चरण-पादुकांना गर्भगृहात घेऊन श्री त्र्यंबकराजाचे दर्शन घडविले जाते. व नंतर श्री त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर पालखीस श्री क्षेत्र पंढरपुरला जाण्याकरीता निरोप दिला जातो।
श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संभामंडपातील भव्य कासवावर नागपंचमी निमित्त चांदीच्या नागाचे पूजन केले
जाते।श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्री त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवट्याचा पालखी सोहळा
दुपारी ३ ते ४ या वेळेत संपन्न होतो।
श्रावण महिन्यात नित्य त्र्यंबकेश्वर नगरीतील विविध देवतांचे
(गंगा गोदावरी - तीर्थराज कुशावर्त ,केदारेश्वर महादेव, ब्रह्मगिरी वरील मूळगंगा, कर्परदीकेश्वर महादेव,
श्री हनुमान, इत्यादींचे देवस्थानच्या वतीने वतनदारांमार्फत पूजन अभिषेक केले जाते.
बैल पोळ्याच्या दिवशी श्री त्र्यंबकेश्वर मंदिर स्थित आकर्षक महानंदीचे पुजन केले जाते व सांयंकाळी देवस्थानच्या असलेल्या मानाच्या बैलांचे पुजन विश्वस्तांच्या हस्ते देवस्थान कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर केले जाते.देवस्थानच्या मानाचे बैलांच्या पुजनेनंतर त्र्यंबकेश्वर नगरीतील बैल पोळा उत्सवास प्रारंभ होतो.
श्री त्र्यंबकेश्वर येथील सभागृहात पांच दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो.विश्वस्तांच्या शुभहस्ते श्री गणेशाची स्थापना करण्यात येते व नित्य विविध पांच रूपात श्री गणेशाचे विधिवत सकाळी व सायंकाळी पंचोपचार पूजा व आरती केली जात तसेच स्थानिक पुरोहीतांमार्फ़त शांतिपाठ पठन केले जाते व स्थानिक भजनी मंडळाकडून भजन व कीर्तन आदी धार्मिक/ सांस्कतीक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुळ नक्षत्रास त्र्यंबकेश्वर नगरीतुन सवाद्य मिरवणूक काढुन श्री गणेशाचे विधिवत विसर्जन केले जाते .वरील सर्व सोहळ्यास विश्वस्त, पुजक, वतनदार, आधिकारी व कर्मचारी वर्ग उत्साहाने सहभागी होत असतात
अश्विन शुध्द अष्टमीस त्र्यंबकेधर नगरीतील त्री-देवी म्हणजेच श्री कोलांबिका , श्री निलांबिका व श्री
भूवनेश्वरी या ठिकाणी देवस्थानच्या वतीने नवचंडी यज्ञ अनुक्रमे दशपुत्रे, महाजन, देशमुख यांच्या मार्फत केला
जातो.
सायंकाळी त्र्यंबकेश्वर नगरीतील नवदुर्गाचे विश्वस्तांकडून पंचोपचार पूजन व साडी चोळी कार्य
संपन्न केले जाते .
प्रात:काली ब्रह्ममुहूर्तावर विश्वस्तांचे हस्ते श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे महापूजन केले जाते. नंतर
सकाळी देवस्थानच्या भांडारगृहात असणाऱ्या अस्त्रशस्त्र यांचे पूजन केले जाते.
यात हर्ष महाल, व्यासपीठ,
ध्वजास्तंभ, पिंपळ पार, रथ, नगार खान्यातील नगारे, गोमाता, कोठी संस्थानातील शस्त्रे, घटीका, टोल, स्वयंपाक
घरातील चूल, देवस्थानचे वाहने, अन्य आधुनिक उपकरणे, संगणक, इत्यादी यांचा समावेश होतो.
सायंकाळी श्री
त्र्यंबकराजांचे पंचमुखी सुवर्ण मुखवट्याचे त्र्यंबकेश्वर नगरतून पालखी सोहळ्याद्वारे पारंपरिक मार्गाने
सीमोल्लंघनासाठी नगरीच्या सीमेवर नेऊन त्या ठिकाणी शमी वृक्षाचे पूजन केले जाते. ग्रामदेवी महादेवीचे दर्शन
घेऊन पालखी श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात परत आणली जाते. श्रींचे मुखवट्यास सुवासिनींकडून औक्षण केले जाते.
अशा रितीने विजयादशमीचा उत्सव साजरा केला जातो.
अश्विन वद्य १४ (नरक चतुर्दशी)
ब्रह्ममुहूर्तावर श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे महापूजा करुन ज्योतिर्लिंगास अभ्यंग स्नान करविले जाते.
श्री त्र्यंबकेश्वराचे पंचमुखी सुवर्ण मुखवट्याचे व रत्नजडीत मुकूटाचे एकत्रित पूजन करुन लक्ष्मीपूजन केले जाते. दीपावलीचे संपूर्ण पाच दिवस श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरास नयनरम्य विद्युत रोषनाई करुन दिपोत्सव साजरा केला जातो.
प्रात:काळी ब्रह्ममुहूर्तावर श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे विधीवत महापूजन केले जाते.सायंकाळी श्री त्र्यंबकराजांचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा सवाद्य मिरवणुकीने पालखीद्वारे मंदिरात नेला जातो.
गर्भगृहतील श्रींच्या मुख्यपिंडीवर प्रदोष पुष्प पूजेवेळी श्री पंचमुखी परमेश्वराचे पूजन केले जाते. याचवेळी हर्षमहल (आरसे महाल) उघडून श्री त्र्यंबकराजांच्या चांदीच्या मुखवट्याची हर्षमहालात स्थापना केली जाते. सायंकाळचे पूजेसमयी गर्भगृहात असलेला श्री त्र्यंबकराजांचा सुवर्ण मुखवटा पुन्हा विधिवत त्याच्या जागेवर प्रस्थापित होतो व त्याचे सुवासीनींकडून औक्षण केले जाते.
श्री त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंगाचे ठिकाणी वैकुंठ चथुर्दशीचे विशेष महत्व आहे. हरिहर भेटीचे औचित्य साधुन मध्यरात्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे सप्ताधन्ययुक्त महापुजन केले जाते. श्री त्रयंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे पिंडीवर पंचमुखी सुवर्ण मुखवटा व अन्य दोन चांदीचे मुखवटे ठेऊन त्रिगुणात्मक रुपात पुजन केले जाते. मध्यरात्री आरतीने पुजेची सांगता होते. हा सोहळा अत्यंत मनोहारी असतो.
“ब्रह्मगिरी पर्वत” हे असं प्रतिष्ठित स्थान आहे जिथे पवित्र गंगा नदीचा उगम झाला होता. ब्रह्मगिरी पर्वताची उंची समुद्रसपाटीपासून ४२४८ फूट असून ब्रह्मगिरी च्या पर्वतरांगांतून गंगा नदी वाहत जाते. ब्रह्मगिरी पर्वतावर ७०० पायऱ्या असून शिखराकडे जाण्यासाठी किमान ४ ते ५ तास लागतात.
“गंगाद्वार” हे ब्रह्मगिरी पर्वताचे मुख्य द्वार मानले जाते. पायथ्यापासून साधारण अर्ध्या अंतरावर गंगाद्वार स्थित आहे. येथे श्री “गोदावरी” देवीचे मंदिर सुद्धा आहे. असे मानले जाते की, गंगा नदी प्रथमतः गंगाद्वार येथे प्रकट झाली होती आणि गौतम ऋषींनी “कुशावर्त तीर्थ” इथे गंगेला पुढे जाण्यास अडवले त्यामुळे गोदावरी हि “गौतमी गंगा” नावाने ओळखली जाऊ लागली. कुशावर्त तीर्थावर १२ वर्षातून एकदा येणारा कुंभमेळा भरतो.
पवित्र गंगा नदी ३ दिशेने म्हणजेच पूर्वेकडे-गोदावरी नदी, दक्षिणेकडे-वारणा नदी तर पश्चिम दिशेला पश्चिमवाहिनी नदी म्हणून ओळखली जाते आणि अंततः ती चक्रतीर्थाला जाऊन मिळते. भाविक त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर पवित्र गंगा आणि अहिल्या नदीच्या पवित्र संगमावर संतती प्राप्तीसाठी वेगवेगळ्या पूजा करण्यासाठी येतात.
ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदी अदृश्य होऊन कुशावर्त कुंडात प्रकट होते. पुराणांमधील संदर्भांनुसार कुशावर्त तीर्थात “श्री गौतम ऋषी” यांनी गंगा नदीला अडवले म्हणून त्यामुळे पाप निवारण व पुण्यप्राप्तीसाठी अनेक भाविक इथे स्नान करतात. विशेषकरून ह्या ठिकाणी १२ वर्षातून एकदा “कुंभमेळा” भरतो. पौराणिक संदर्भानुसार कुशावर्त तीर्थावर प्रभु श्री रामांनी पित्रांच्या मुक्तीसाठी राजा दशरथाचे श्राद्ध कर्म केल्याचे कळते. म्हणूनच त्रिपिंडी श्राद्ध विधीसाठी अनेक भक्तगण देशविदेशातुन येथे येतात.
कुशावर्त तीर्थ येथे अनेक तीर्थस्थळ आहेत त्यापैकी कुशेश्वर महादेव, शेषशायी भगवान विष्णु, चिंतामणी गणेश हे मंदिर आहेत
त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी तीन सोपे मार्ग (जसे रस्त्याने, रेल्वेने व हवाईमार्गे) आहेत.
विविध राज्यांमधून रेल्वेमार्गाने आपण नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे येऊ शकतात व त्यानंतर तिथून पब्लिक वेहिकल ने त्र्यंबकेश्वरला पोहचता येते.
निवडक राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी नाशिकच्या नजीकचे ओझर विमानतळ उपलब्ध आहे. जिथून खाजगी वाहने घेऊन थेट त्र्यंबकेश्वरला पोचता येते.
महत्वाचे निवेदन: कुठल्याही पूजेच्या सविस्तर माहितीसाठी आपण आमच्या वेब पोर्टलवर दिलेल्या अधिकृत “ताम्रपत्रधारी” गुरुजींशी संपर्क साधावा..
Copyrights 2020-21. Privacy Policy All Rights Reserved
Designed and Developed By | AIGS Pvt Ltd